Ad will apear here
Next
मंडईतला शारदा गजानन

पुण्यातील गणेशोत्सवामध्ये जी महत्त्वाची मंडळे आहेत, त्यापैकी एक म्हणजे अखिल मंडई मंडळ. शारदा गजाननाची सुरेख मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य. या मंडळाबद्दल...
.........
पहिलवान लक्ष्मण डोंगरे काची यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानीला साकडे घातले. त्या मंदिरातील होमकुंडाच्या वर शारदा गणेशाची मूर्ती आहे. ‘मूल झाले तर याच गणेशाची मूर्ती बनवून स्थापना करीन,’ असा नवस ते बोलले. त्यांच्या घरी पाळणा हलला. त्यामुळे नवस फेडण्यासाठी १८९४मध्ये त्यांनी मंडई गणपतीची स्थापना केली.

त्यांनी त्या काळी ‘इकोफ्रेंडली’ मूर्ती बनवली आहे. कागदाचा लगदा, भुसा, माती, गावात, रांझा आदीपासून मूर्ती बनविण्यात आली आहे, अशी माहिती अखिल मंडई गणपती मंडळ ट्रस्टचे खजिनदार संजय मते यांनी दिली.

त्या वेळी या गणेशाची डोक्यावरून मिरवणूक काढली जात असे. ही मूर्ती वजनाला हलकी असल्याने ते शक्य होत असे. व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून याला ओळखले जात असे. मंडई गणपतीच्या परिसरात १२ बलुतेदारांचा व्यापार होता. या मूर्तीला बरीच वर्षे झाल्यानंतर १९१०-२०मध्ये नवीन मूर्ती बनविण्यात आली. दोन्ही मूर्तींची मिरवणूक काढून जुनी विसर्जित करायची व नव्या मूर्तीची स्थापना करायची, असे ठरले होते. परंतु त्या वेळी पाऊस आला व नवीन मूर्ती खराब झाली. परंतु जुनी मूर्ती व्यवस्थित होती. त्यामुळे नव्या मूर्तीचे विसर्जन झाले व जुन्याच मूर्तीची पुन्हा स्थापना झाली, असे सांगून ही चल मूर्ती असल्याचेही मते यांनी स्पष्ट केले. १९५२मध्येही पुन्हा शाडू मातीची दुसरी मूर्ती बनविण्यात आली; मात्र उत्सवात ही जुनीच मूर्ती वापरली जाते.

या मंडळाचा भर धार्मिक कार्यांवर अधिक असतो. या शारदा गणेशावर भाविकांचा फार विश्वास असून, मूलबाळ होण्यासाठी या गणपतीला नवस केला, तर तो पूर्ण होतोच अशी श्रद्धा आहे. शारदा गणेशाची चल मूर्ती एकमेव आहे. हा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. पूर्वी भाविकांना या मूर्तीच्या जवळ जाता येत असे; मात्र गेल्या सहा-सात वर्षांसून मूर्तीला थेट स्पर्श करू दिला जात नाही. परंतु गणरायाचे दर्शन नीट व्हावे यावरही गणेशोत्सवात लक्ष दिले जाते. त्यामुळे देखावा हा दुय्यम भाग ठरतो. यातही महालाच्या देखाव्यालाच प्राधान्य दिले जाते. आजवर विवेक खटावकर, जीवन रंधीर, भावसार, विनोद एलारपूरकर, संदीप इनामके, रूपेश पांचाळ, हरीश चिरमाडे आदींनी उत्सवातील देखावे बनविले आहेत.

मंडळाचे मोठे भजनी मंडळ आहे. आळंदीला धर्मशाळा आहे. फार पूर्वीपासूनच येथे सर्वधर्मसमभाव पाळून गणरायाचे पूजन होत आले आहे. तांबोळी आळी, पान आळी, मडके आळी येथील लोक एकत्र येऊन गणरायाला तोरण बांधतात, आरती करतात. तसेच मंडळाच्या वतीने अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. यात ‘प्लास्टिकमुक्त पुणे’अंतर्गत या धर्तीवर कागदी पिशव्यांचे वाटप, तसेच या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षणही महिलांना देण्यात आले. ध्वनिक्षेपकाच्या भिंतीऐवजी ढोलताशांचा गजर केला जातो. विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. एके वर्षी दुष्काळ पडला होता, तेव्हा येथून जनावरांसाठी चारा पाठवण्यात आला होता. हॉस्टेलच्या गरीब विद्यार्थ्यांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळण्यासाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले. तसेच पुणे बोर्डिंग हाउसच्या गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचा पाच वर्षांचा खर्च करण्यात येतो.

गणेशोत्सवादरम्यान अभिषेक, याग, भजन यांचे आयोजन करण्यात येते. तसेच बऱ्याच शाळांतील मुले अथर्वशीर्ष पठणाला येतात. या काळात पूजेसाठी अनेक गुरुजी, १० सुरक्षारक्षक, १० कामगार व अन्य कार्यकर्ते कार्यरत असतात. या काळात मंडळाकडून साखर फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. शिवाय भाविकही बराच प्रसाद स्वेच्छेने नियमितपणे पाठवतात. उत्सवादरम्यान व नंतरही उरणाऱ्या निर्माल्याचे खतात रूपांतर केले जाते. उत्सवानंतर सर्व स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात येतो. हा उपक्रम १९९०पासून अखंडितपणे सुरू आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZANBF
Similar Posts
उत्सवातील कोहिनूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील जणू कोहिनूरच ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पुण्याचा गणेशोत्सव बघायला केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. पुण्यात आलेला कोणीही गणेशभक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणे सोडतच नाही, हेही तेवढेच सत्य आहे. या गणपती मंडळाबद्दल
केसरीवाडा गणपती.. ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; गुरुजी तालीम गणेश मंडळ पुण्यातील गुरुजी तालीम गणेश मंडळाचा गणपती मानाचा तिसरा आहे. यंदा या मंडळाचे १३१वे वर्ष आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे पुण्याच्या गणेशोत्सवातील महात्म्य अन्यन्नसाधारण आहे. या मंडळाबद्दल...
श्री कसबा गणपती लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी १८९३मध्ये पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे होत आहेत. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. काळानुसार या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले असले, तरी श्रद्धा कायम आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यनगरीतल्या मानाच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language